मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा या उद्देशाने ‘महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात आला. आयुष्मान भारत योजनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
या कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महापौर सहाय्यता निधी, आयुष्मान भारत योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचा लाभ पात्र नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. उपचारासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, अर्ज प्रक्रिया, रुग्णालयांशी समन्वय तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक आणि कामगारनगरी असल्याने अनेक कुटुंबांना गंभीर आजारांच्या उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन या कक्षामार्फत आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रुग्णालयात दाखल होण्यापासून ते उपचार पूर्ण होईपर्यंत आवश्यक मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता आणि समन्वयासाठी दोन ‘आरोग्यमित्र’ कायमस्वरूपी नियुक्त करण्यात आले असून, भविष्यात गरजेनुसार या सेवेचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले, राज्यातील ४,८०० हून अधिक शासकीय व खासगी रुग्णालये आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनांशी संलग्न आहेत. पात्र नागरिकांना वेळेत कॅशलेस उपचाराचा लाभ मिळावा यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून या योजनांची अधिकाधिक जनजागृती होणे आवश्यक आहे.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, “शहरातील कोणताही नागरिक आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्ष नागरिक आणि शासन यांच्यातील प्रभावी दुवा ठरेल.”
या कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिकेचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांसाठी संपर्क :
* मनोज शिंदे – ८४१२९९५५९९
* अभिजित पानखेडे – ९११२४०४१८१
* टोल-फ्री हेल्पलाईन – १८०० २३३ २२००


