भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने रविवारी मॅट्टेओ पेलिकोन कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. यासोबतच तीने या वजनी गटाच्या जागतिक क्रमवारीतही अग्रस्थानी झेप घेतली आहे.
जागतिक कांस्यपदक विजेत्या २६ वर्षीय विनेशने अंतिम फेरीत कॅनडाच्या डायना मेरीला ४-० असे पराभूत केले. टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला कुस्तीपटूंमधून फक्त विनेशच पात्र ठरली आहे. या स्पर्धेत विनेशने प्रतिस्पर्धी कुस्तीपटूला एकही गुण घेऊ दिला नाही. तिच्या दोन लढतींमध्ये समोरील खेळाडूने दुखापतीमुळे माघार घेतली, तर दोन लढतींमध्ये तिने अनुक्रमे ६-०, ४-० असा विजय मिळवला. स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी विनेश क्रमवारीत तिसऱ्या स्थानी होती, परंतु १४ गुणांची कमाई करून तिने अग्रस्थान पटकावले. ऑलिम्पिकपूर्वी तिचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी या स्पर्धेतील कामगिरी मोलाची ठरली आहे.