राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रमुख नेते अजितदादा पवार यांचा आज बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी सुमारे 8:45 वाजता बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान त्यांच्या विमानाला अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार अपघात इतका भीषण होता की विमान पूर्णतः जळून खाक झाले असून या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अजित पवार आज बारामती येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी येत होते. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा, अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून लँडिंगदरम्यान तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरी विमानपर्यटन विभाग (DGCA) कडून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
या भीषण घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावरून अनेकांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


