पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात काल एका फटाक्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे दुकानातील फटाके एकामागोमाग एक पेट घेत मोठ्या आवाजात स्फोट होत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना तापकीर चौक परिसरात, गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयाच्या खाली असलेल्या फटाक्याच्या दुकानात दुपारच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी सापडले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आग पसरू नये यासाठी युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. दुकानाच्या आजूबाजूला अनेक दुकाने असून शेजारीच सिलेंडर दुरुस्तीचे दुकान असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन विशेष खबरदारी घेण्यात आली.
या आगीमुळे रुग्णालयातील कुणी अडकलं आहे का, याची तपासणी करण्यात आली. सुदैवाने आगीत कुणी अडकल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, दुकानाला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते.


