महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४ ते २८ जानेवारी मराठी भाषा पंधरवडा भरगच्च कार्यक्रमांनी साजरा झाला. या भाषा पंधरवडा अंतर्गत मसाप पिंपरी चिंचवड शाखेने, मराठी भाषा संबंधित विविध कार्यक्रम राबविले ज्यामध्ये साहित्यिकांचा, रसिकांचा, मराठी वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. १४ जानेवारीला या पंधरवड्याचे उदघाटन ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहिन्यूजत्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या # मराठी भाषेच्या विकासाची दिशा # या विषयावरील व्याखानाने झाले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, विनीता ऐनापुरे डॉ. रजनी शेठ , संजय जगताप उपस्थित होते.
१७ जानेवारीला मराठी कथाकथन हा कार्यक्रम उत्साहात पार पडला, ज्यामध्ये बबन पोतदार, नीलिमा बोरवणकर, डॉ. राजेंद्र माने, विनीता ऐनापुरे या ज्येष्ठ कथाकारांनी सहभाग घेऊन रसिकांची वा वा मिळवली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र बेडकिहाळ, प्रा. संजय पवार उपस्थित होते.
२१ जानेवारीला पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई, मसाप कार्यवाह वि. दा. पिंगळे, पत्रकार नाना कांबळे यांचे उपस्थितीत , संत साहित्यात मराठी भाषेचा गौरव” या विषयावर व्याख्यान झाले. सदर व्याख्यानात त्यांनी मराठी भाषेचा विविध संतांनी कसा गौरव केला हे अभंगातून, काव्यातून सोदाहरण सांगितले.
२५ जानेवारीला एक मराठी कवी वा लेखक या कार्यक्रमात बालकवी, कुसुमाग्रज, भालचंद्र नेमाडे, पु. ल. देशपांडे, शांताबाईं शेळके या कवी / लेखकांच्या साहित्यावर प्रा. संपत गर्जे, राजेंद्र घावटे, अपर्णा मोहिले, प्रदीप गांधलीकर, माधुरी विधाते यांनी आपले विचार मांडले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, गायक आनंद माडगुळकर तसेच जिल्हा प्रतिनिधी तानसेन जगताप लेखक, पत्रकार स्वप्नील पोरे उपस्थित होते.
२८ जानेवारीला मराठी भाषा पंधरवडाचा समारोप झाला. सदर कार्यक्रमास मसाप पुणेचे उपाध्यक्ष राजीव बर्वे, कार्यवाह माधव राजगुरू, मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी , लेखक निवेदक श्रीकांत चौगुले उपस्थित होते. सदर कार्यक्रमात विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, शांताबाईं शेळके, ग. दि. माडगुळकर, इंदिरा संत यांच्या विविध कवितांचा जागर करण्यात आला. यामध्ये सात शाळेतील १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये पिंपरी चिंचवड मनपा शाळेचे विद्यार्थी प्रगती मोरे, सय्यद नाजिया, ज्ञान प्रबोधिनी निगडी मधील राज ओमकार जोशी, साईशा हिवरकर, माटे हायस्कूलचे ओवी नेने, प्रणाली वाघ, श्रद्धा खराडे, न्यू इंग्लिश स्कूल सुंसगाव मधील कु. आरती खंदारे, कमलजा देवी विद्यालय कळंब आंबेगाव मधील आर्या साने, मोहिनी पंदारे, जिल्हा परिषद शाळा टाकवे खुर्द चे ईश्वर सुनील गरुड, अक्षर संजय गरुड तर ज्ञानबोधिनी इंग्लिश मिडीयम स्कूल चिखली येथील श्रेया जाधव, सानिका देवकाते आदि विद्यार्थ्यांचा समावेश होता.
मराठी रुजावी मराठी फुलावी या विचारधारेने महाराष्ट्र साहित्य परिषद कार्य करीत असून या पंधरवड्यात सुमारे १००० च्या वर साहित्यिकांनी व रसिकांनी या पंधरवड्यात सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेतला असे राजन लाखे यांनी कळविले आहे.