कलाकारांना आपल्या कामाची पावती प्रेक्षकांकडून केल्या जाणाऱ्या कौतुकातून भेटते. यात चांगली वाईट भावनांनाही कलाकारांना सामोरे जावे लागते. अगदी खलनायकांची भूमिका साकारणारे निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, ललिता पवार, मिलिंद शिंदे यांसारख्या कलाकांरांना अगदी खालच्या पातळीवर केलेल्या टीकेला सामोरे जावे लागले होते. पण त्यावेळेस यांनी ती टीका ही त्यांच्या कामाची पावती असल्याचे सांगत त्याचा सकारात्मकपणे स्विकार केला होता. पण आताची तरूण कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण या टीकेला न जुमानता कलाकार प्रसंगी आपली पातळी सोडून उत्तर देताना दिसतात. असाच एक प्रसंग अभिनेता शशांक केतकरसोबत घडला आहे. ट्रोल करणाऱ्या युजरला शशांकने गलिच्छ भाषेत सडेतोड उत्तर दिले आहे.
सध्या शशांक ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारताना दिसत आहे. एका चाहत्याला त्याची ही भूमिका आवडत नसल्याने त्याने गलिच्छ भाषेत कमेंट करत प्रतिक्रिया दिली. ती कमेंट पाहून त्यावर उत्तर देत शशांक म्हणाला, ‘कलाकरांशी आदराने वागा, पुण्य लाभेल.’ शशांकची ही कमेंट पाहून ट्रोलरने देखील उत्तर दिले. त्या दोघांमधील वाद वाढतच गेला.
पुढे शशांक म्हणाला, ‘तुम्हाला आमच्या क्षेत्राची इतकी काळजी वाटत असेल, तुमच्याकडे उत्तम ऑस्कर विनिंग गोष्ट आणि निर्मितीसाठी पैसा असेल तर तुम्हीच अॅक्टिंग सुरु करा आणि आम्हाला तुमचा डांबर परफॉर्मन्स बघायची संधी द्या. अत्यंत घाण भाषेत आम्ही कलाकार सुद्धा प्रत्येक कमेंटला रिअॅक्ट होऊ शकतो पण फक्त मालिका आवडत नाही, तुम्ही निगेटिव्ह भूमिका करु नका, गोष्टींना लॉजिक नाही वैगरे कमेंट एकीकडी आणि ढुंगण वैगरे शब्द वापरुन रिअॅक्ट होणे एकीकडे.’

‘आम्ही फक्त चेहरे असतो. आमच्यावर किमान १५ जणं असतात. शिवाय मला कलाकार म्हणून वेगळं काही तरी करुन बघायचं होतं आणि प्रेक्षकांनाही वेगळं काहीतरी पाहायचं होतं. ही मालिका आहे.. अजून खूप गोष्ट बाकी आहे… एक निगेटिव्ह पात्र असतं म्हणूनच पॉझिटिव्ह वागणारे हिरो असतात. मेणबत्तीचं अस्तित्व तेव्हाच जेव्हा बाजूला काळाकुट्ट अंधार असतो’ असे शशांक त्या ट्रोलरला उत्तर देत म्हणाला.