अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिची मोठी बहीण मधु हिचा वाकड येथे 12 मार्च 2023 रोजी संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांकडून योग्य तपास झाला नसल्याचा दावा भाग्यश्री करीत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा म्हणून भाग्यश्रीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मधु यांच्या मृत्यूच्या तीन आठवड्यांपूर्वीच त्यांचे पती संकेत मार्कंडेय यांचे निधन झाले होते. मधु या केक बनविण्याचा वर्कशॉप घेणार होत्या. त्याकरिता त्यांची एका महिलेशी ओळख झाली होती. या महिलेच्या म्हणण्यानुसार केक वर्कशॉपसाठी त्यांना एक खोली आवश्यक होती. तेव्हा ती खोली पाहण्यासाठी घटनास्थळी मधू आणि संबंधित महिला गेली होती. त्यावेळी मधु चक्कर येऊन कोसळल्या. मधु यांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते.
वाकड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. घटनास्थळी मिळालेला मधु यांचा मोबाईल पॅटर्न लॉक असल्याने न्याय वैद्यक विभागाला अद्याप उघडता आलेला नाही. नैसर्गिकरीत्या (हार्ट डीसिज) अर्थात वैद्यकीय तांत्रिक भाषेनुसार हृदय रोगाशी संबंधित अचानक झालेल्या त्रासाने मधू यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे.