मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या वतीने आज, गुरुवारी औंध, बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरात बंद पुकारण्यात आला आहे. मात्र, सोशल मीडियावर पुणे बंद असल्याच्या अफवा पसरल्याने पुणेकरांमध्ये बुधवारी सायंकाळी गोंधळ उडाला होता.
या परिसरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली, तर काही कॉलेजांनी या परिसरातील विद्यार्थी येऊ शकणार नसल्याने गुरुवारी होणारे पेपर पुढे ढकलले. या परिसरातून हिंजवडीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अनेक कंपन्यांनी त्यांना उद्या ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सुविधा दिली. त्यामुळे संपूर्ण शहरातच बंद आहे, अशी अफवा सर्वत्र पसरली. मात्र, मराठा क्रांती मोर्चाने संपूर्ण शहरात बंद पुकारलेला नसून, केवळ ठरावीक भागापुरताच तो मर्यादित असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चातर्फे शहरात केवळ लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. महात्मा फुले मंडर्इतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.