व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरण राज्यात चांगलेच गाजले. याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करून अटक करण्यात आले. तसेच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आले. आता याप्रकरणी अटक आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गोरविरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यातील (यूएपीए) कलमे लावण्यात आली आहेत, अशी माहिती मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विशेष न्यायालयाला दिली. न्यायालयाने या दोघांना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
नरेश गोर याने मुख्य आरोपी वाझेंच्या सूचनेवरून गुजरात येथून बनावट कागदपत्रांच्या आधारे १४ सीम कार्ड मिळवली. यातील पाच सीम कार्ड क्रमांकासमोर वाझे यांचे नाव लिहिले होते. ही पाच सीम कार्ड वाझेंच्या सूचनेवरून शिंदेच्या ताब्यात दिली असून मनसुख यांच्या हत्येच्या कटात या सीम कार्डचा वापर झाल्याचा संशय एनआयएला आहे. गोर याने मिळवलेल्या सीम कार्डपैकी १२ जप्त करण्यात आली असून उर्वरित दोन सीम कार्डचा शोध सुरू आहे, असे अॅड. गोन्साल्विस यांनी न्यायालयाला सांगितले. गोर याला गुजरातच्या एका कंपनीच्या नावे १४ सीम कार्ड उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीस मंगळवारी एटीएसने एनआयएच्या हवाली केले.
वाझे यांच्या नावे नोंद असलेली मित्सुबिशी आऊटलॅण्डर गाडी एनआयएच्या पथकाने कामोठेतील एका गृहनिर्माण संस्थेच्या आवारातून मंगळवारी जप्त केली. या गाडीचा वापर वाझे यांचे सहकारी करत होते. तसेच एटीएसने दमण येथून ताब्यात घेतलेली वॉल्वो गाडीही एनआयएने ताब्यात घेत पेडर रोड येथील विभागीय कार्यालयात आणली. या दोन्ही गाड्यांचा अंबानी धमकी, मनसुख हत्येत वापर झाला होता का, याचा तपास एनआयए करत आहे.