पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या (PCSCL) सह मुख्य कार्यकारी अधिकारी (ABD) पदावर शहर अभियंता मनोज सेठिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे झालेल्या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
माजी शहर अभियंता मकरंद निकम यांच्या राजीनाम्यामुळे सह मुख्य कार्यकारी अधिकारी (ABD) पद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर मनोज सेठिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणे, नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, शहर अभियंता तथा नवनियुक्त सह मुख्य कार्यकारी अधिकारी (ABD) मनोज सेठिया, संचालक प्रदीप भार्गव, यशवंत भावे यांच्यासह अधिकारी व संचालक उपस्थित होते.
मनोज सेठिया यांच्याकडे शहर अभियंता पदासोबतच स्मार्ट सिटीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी (ABD) पदाची जबाबदारी देण्यात आल्याने शहरातील स्मार्ट सिटीशी संबंधित प्रकल्पांच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


