Sunday, June 16, 2024
Homeराजकारणमनोज जरांगेंचं नारायण राणेंना सणसणीत प्रत्युत्तर … गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणचा घास जवळ...

मनोज जरांगेंचं नारायण राणेंना सणसणीत प्रत्युत्तर … गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणचा घास जवळ आला असताना नेत्यांनी अन्नात माती कालवू नये

महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा बांधवांच्या आरक्षणाचा घास जवळ आला आहे. त्यांच्या पाठीवर जुन्याजाणत्या मराठा नेत्यांनी शाबासकीची थाप द्यायला हवी. त्यांनी भावनाशून्य होऊन वागू नये. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणचा घास जवळ आला असताना या नेत्यांनी अन्नात माती कालवू नये, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे यांच्या एकसदस्यीय समितीने मराठा आरक्षणासाठीचा अहवाल तयार केला होता. मराठा आरक्षणाच्या आजवरच्या लढ्यात राणे समितीचा हा अहवाल प्रमाण मानला गेला. मात्र, आता मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी लावून धरल्यानंतर नारायण राणे यांनी त्याला विरोध केला आहे. मी ९६ कुळी मराठा आहे, कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही, अशी ठाम भूमिका नारायण राणे यांनी घेतली होती. राणेंच्या या वक्तव्याला मनोज जरांगे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. ते शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांना नारायण राणे यांच्या वक्तव्यासंदर्भात भाष्य करताना म्हटले की, राज्यातील सरकार १०० टक्के मराठा समाजाविरोधात उठले आहे. २०२४ पर्यंत आम्ही शांत राहणार आहोत. सरकार कोणाला पुढं घालतंय ते पाहू. २०२४ मध्ये मराठा समाज काय असतो, हे आम्ही दाखवून देऊ. सामान्य मराठ्यांमध्ये फूट पाडणे सोपे नाही. सामान्य शेतकऱ्यांना सरकारने डिवचू नये, शांत राहावं, घेतलेल्या वेळेत आरक्षण द्यावे. सरकारने आता आमचा अंत बघू नये. आतापर्यंतच्या लढ्यात बळी गेलेल्या मराठा बांधवांचं बलिदान वाया जाऊ देऊ नये. सरकारने मराठ्यांचे बळी घेऊ नयेत. ही गोष्ट सरकारला महागात पडेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. जुन्नर, बारामती, फलटण, दहिवाडी परिसरात त्यांच्या सभा होणार आहेत. आज राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगे यांची सभा होणार आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मराठा समाजाला येत्या २४ तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु होईल. पण हे शांततेचं युद्धही सरकारला पेलवणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments