चिंचवड (प्रतिनिधी): चिंचवडगाव येथील वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्पात जादा चटई निर्देशांक (टीडीआर) मिळवून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि शासनाची फसवणूक केली जात असल्याचा खळबळजनकारोप माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून जादा टीडीआर देण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, अशी जोरदार मागणी त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नेमका प्रकार काय ..?
वेताळनगर येथील एस.आर.ए. प्रकल्पाचे काम ‘क्रिसला इलाईट एल.एल.पी.’ या बिल्डरला देण्यात आले आहे. मूळ पाहणी अहवालानुसार (सर्व्हे) या झोपडपट्टीत एकूण १३१३ घरे होती. यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने बी.एस.यु.पी. (BSUP) योजनेअंतर्गत १००८ घरांचे आणि २४ दुकानांचे वाटप आधीच पूर्ण केले आहे. यानुसार आता केवळ ३०५ घरांचे वाटप शिल्लक राहिलेले असताना, ‘क्रिसल इलाईट एल.एल.पी.’ कंपनीचे मालक सागर अगरवाल यांनी तब्बल ४७५ घरांचे हस्तांतरण बाकी असल्याचे कागदोपत्री दाखवले आहे. या अतिरिक्त दाखवलेल्या घरांच्या आधारे कंपनीकडून पालिकेकडे अतिरिक्त चटई निर्देशांकाची (टीडीआर) मागणी केली जात आहे.
राज्य शासन तथा पालिकेची फसवणूक थांबवण्याची मागणी…
केवळ ३०५ घरे शिल्लक असताना ४७५ घरांचे हस्तांतरण दाखवून जादा टीडीआर लाटण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असून, ही थेट महापालिका आणि राज्य शासनाची फसवणूक आहे, असा थेट आरोप वाघेरे यांनी केला आहे.
त्यामुळे या संपूर्ण वेताळनगर एस.आर.ए. प्रकल्पाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि संबंधित बिल्डरने जादा टीडीआर मिळवण्यासाठी सुरू केलेली सर्व प्रक्रिया महापालिकेने तत्काळ स्थगित करावी, अशी ठाम मागणी रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
टीप : संबंधित बिल्डर / कंपनीची बाजू आणि महापालिका प्रशासनाचे अधिकृत स्पष्टीकरण उपलब्ध झाल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होऊ शकेल.


