Wednesday, November 11, 2026
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कारवाई ,!दुबईत बसून भारतात सायबर फसवणुकीचे जाळे; मुख्य...

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कारवाई ,!दुबईत बसून भारतात सायबर फसवणुकीचे जाळे; मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक

१५० हून अधिक बँक खाती वापरून एक कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड : दुबईत बसून भारतातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी रॅकेटचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली असून, आरोपींनी १५० हून अधिक बँक खात्यांचा वापर करून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची सायबर फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. या गुन्ह्यांमध्ये परदेशात राहून वेगवेगळ्या बँक खात्यांच्या माध्यमातून सायबर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचा सहभाग असल्याचे तपासात निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अशा आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ४२/२०२६ च्या तपासादरम्यान पोलिसांना बँक खाती पुरवणाऱ्या टोळीची माहिती मिळाली. त्यानुसार तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. सानेवस्ती, चिखली, पुणे) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी, पुणे) याच्या मदतीने बँक खाती उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले.

या खात्यांमधून सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारून ती रोख स्वरूपात काढली जात होती. तसेच काही रक्कम कमिशन ठेवून उर्वरित पैसे सुमंत ऊर्फ नानू रवींद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण, पुणे) याला पाठवले जात असल्याचे तपासात उघड झाले.

पोलिसांच्या तपासात सुमंत दसरे हा दुबईत राहून चिनी सायबर गुन्हेगारांसोबत मिळून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले. त्याच्याविरोधात हैदराबाद, तेलंगणा आणि काळेवाडी पोलीस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात मिळाली.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीने लुक आऊट सर्क्युलर (LOC) जारी केले. इंटरपोलच्या माध्यमातून दुबईत असलेल्या मुख्य आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर दुबईत त्याला ताब्यात घेऊन भारतात डिपोर्ट करण्यात आले. मुंबई विमानतळावरून सहाय्यक पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली.

सहा हजार रुपयांच्या नोकरीपासून सुरू केला गुन्हेगारी प्रवास

प्राथमिक तपासात सुमंत दसरे सुरुवातीला दरमहा सहा हजार रुपये पगारावर शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉडसाठी कॉलिंग व मेसेजिंगचे काम करत असल्याचे समोर आले. या कामातून त्याला फसवणुकीच्या रकमेमधून चार टक्के कमिशन मिळत होते. त्यानंतर त्याने चिनी आरोपींकडून विविध इंटरनॅशनल कार्ड मिळवून महागड्या वस्तूंची खरेदी करून त्याबदल्यात कमिशन मिळवण्यास सुरुवात केली.

पुढे सायबर गुन्ह्यांची संपूर्ण कार्यपद्धती समजल्यानंतर त्याने चिनी आरोपींसोबत भागीदारी करून स्वतंत्रपणे सायबर फसवणुकीचे काम सुरू केले. या रॅकेटसाठी त्याने तुषार चौधरी आणि आदर्श वाघमारे यांच्या माध्यमातून १५० हून अधिक बँक खाती मिळवली. या खात्यांचा वापर करून फसवणुकीची रक्कम स्वीकारली जात होती. या व्यवहारांमधून त्याला फसवणुकीच्या रकमेच्या २० टक्के कमिशन मिळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या रॅकेटच्या माध्यमातून आतापर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

सध्या तिन्ही आरोपींना ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या रॅकेटमध्ये आणखी किती आरोपी सहभागी आहेत आणि दुबईतून चालणाऱ्या कॉल सेंटरचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस करत आहेत.

या कारवाईत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments