Sunday, August 16, 2026
Homeअर्थविश्वमोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य अभियंता संजय कुलकर्णी निलंबित,...

मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य अभियंता संजय कुलकर्णी निलंबित, विभागीय चौकशीचे आदेश

पिंपरी, दि. १५ जुलै : मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै २०२६ रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठी प्रशासकीय कारवाई करत मुख्य अभियंता-१ संजय नारायण कुलकर्णी  आणी कार्यकारी अभियंता अ गट योगेश आल्हाट यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. तसेच त्यांच्याविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार, मोशी कचरा डेपोवरील दैनंदिन कामकाजाचे पर्यवेक्षण, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची स्थिती तपासणे आणि परिसरातील सुरक्षिततेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुख म्हणून मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर होती. मात्र, ८ जुलै रोजी कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा मोठा भाग कोसळून लगतच्या आरसीसी इमारतीवर पडल्याने ९ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणात त्यांनी कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा केल्याचा ठपका आदेशात ठेवण्यात आला आहे.

यापूर्वी कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी दिलेला खुलासा महापालिकेने असमाधानकारक, तथ्यहीन आणि नियमांचे समर्थन न करणारा असल्याचे नमूद करत तो फेटाळून लावला आहे.

आदेशात नमूद केल्याप्रमाणे, संजय कुलकर्णी यांनी कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा, अधिकारांचा गैरवापर, अनधिकृत बांधकामांना प्रशासकीय अभय, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक सुरक्षेबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबन कालावधीत त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, मुख्यालय पिंपरी येथेच राहावे लागणार आहे. वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, तसेच अन्य नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही, अशा अटीही आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत.

महापालिकेने संबंधित विभागाला विभागीय चौकशीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून नियोजित मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments