कुख्यात ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला अटक केल्यानंतर अनेक धागेदोरे समोर येते आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी एका शैक्षणिक संस्थेचा प्रमुख विनय अर्हना याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. विनय अर्हनाचा ड्रायव्हर दत्ता डोके याला या प्रकरणात अटक झाली होती. दत्ताने ललित पाटीलला गाडीने मुंबईला सोडल्याचा संशय आहे. त्या प्रकरणात विनय अर्हना यालाही अटक करण्यात आली आहे.
ललित पाटीलला फरार होण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली होती. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी आणखी एक अटक केली आहे.
पुण्यातील रोझरी स्कूल या शैक्षणिक संस्थेचा संचालक विनय अर्हना याला केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्याचा ललित पाटीलशी संबंध आलेला होता. दोघांची ओळख ससून हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक १६ मध्ये झाली होती.
अर्हनाचा कार चालक दत्ता डोके ससून रुग्णालयात रोज घरचा डबा घेऊन येत होता. त्यामुळे त्याची देखील ललित पाटीलशी ओळख झालेली होती. या ओळखीतून ललित पाटील रुग्णालयातून पसार झाल्यावर अर्हनाच्या चालकाने त्याला मदत केल्याचा आरोप आहे.
ललित पाटील ससून रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर एका फाईव्ह स्टार हॉटेलला गेला. तिथून तो रिक्षाने सोमवार पेठेत गेला. तिथे अर्हानाचा कार चालक दत्ता डोकेने ललितला कारमधून रावेत येथे नेले. नंतर पुढे मुंबईला सोडले. तसेच खर्चासाठी त्याला दहा हजार रुपये देखील दिले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अर्हना याला देखील पुणे पोलिसांनी आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. सध्या तो येरवडा कारागृहात होता.