Sunday, July 20, 2025
Homeगुन्हेगारीबदलापूर प्रकरणात मुख्य आरोपी अटक , चौकशी सुरु

बदलापूर प्रकरणात मुख्य आरोपी अटक , चौकशी सुरु

बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. यानंतर संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. तर पालकांकडूनही शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता याप्रकरणी पोलिसांनी दोन मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक केली. तसेच संस्था चालक, शिक्षकांचीही पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या प्रकरणानतंर पीडित मुलीच्या कुटुंबाने 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. यानंतर तक्रार नोंदवण्यात आली.

मुख्य आरोपीला अटक

यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करुन आरोपीला अटक केली. अक्षय शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. तो 24 वर्षांचा असून या शाळेतील सफाई कर्मचारी म्हणून तो काम करत होता.

मुख्याध्यापिकेसह दोन सेविका निलंबित

तसेच याप्रकरणी शाळा प्रशासनाने तीन जणांवर कारवाई केली आहे. शाळेच्या संचालक मंडळाने याप्रकरणी मुख्याध्यापिकेला निलंबित केलं आहे. तसेच शाळेमध्ये मुलींची देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेल्या 2 सेविकांनाही कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. तसेच तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बदलापूर पूर्वेकडील पोलीस अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास हलगर्जी केल्याचा आरोप करत बदली केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संस्था चालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण संस्थेने एक चौकशी समिती नेमली आहे.

संस्था चालक व शिक्षकांचीही चौकशी सुरु

बदलापूर पोलिसांकडून संस्था चालक व शिक्षकांची देखील चौकशी करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी शाळा प्रशासनावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासोबच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची योग्य ती दखल घेतली आहे. तसेच याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन यावर तात्काळ कारवाई करुन कठोर शिक्षा करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments