आकुर्डी येथील महावितरण कार्यालयाच्या निष्काळजी कारभाराचा गंभीर प्रकार समोर आला असून, तब्बल सहा दिवस एका व्यावसायिक ग्राहकाला अंधारात ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यामुळे संतप्त ग्राहकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत संताप व्यक्त केला आहे.
आकुर्डीतील केएसबी चौक परिसरात ‘पूनम सेल्स कॉर्पोरेशन’ या नावाने व्यवसाय करणाऱ्या ग्राहकाचा गेल्या सहा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित ग्राहकाने अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार करत जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. तसेच, सहा दिवसांच्या नुकसानीपोटी सुमारे ६० हजार रुपयांची भरपाई संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, वीजपुरवठा तात्काळ सुरळीत न केल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा संबंधित ग्राहकाने दिला आहे. या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
याशिवाय, महावितरणकडे मनुष्यबळ व आवश्यक साहित्याचा तुटवडा असल्याची बाबही समोर येत आहे. अनेक कामे नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचा आरोप असून, ऑनलाइन नाव बदल प्रक्रियेतही टेबलखालून पैसे दिल्याशिवाय अर्ज नाकारले जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या सर्व प्रकाराबाबत पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननेही आकुर्डी उपविभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. महावितरण प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


