महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी अमरावती येथे एका कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे यांच्याविरोधात पुणे शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. संभाजी भिडे आणि अमरावती येथील एका कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध फौजदारी मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांनी महात्मा गांधींच्या वंशाविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तुषार गांधी म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांनी महिनाभरात याप्रकरणी कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. आम्ही भिडे आणि कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
भिडे यांनी बापूंच्या आई-वडिलांबाबत केलेली टिप्पणी अतिशय गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक व्यक्ती म्हणून महात्मा गांधींवर अनेकदा टीका होते पण हे अतिशय गंभीर विधान होते आणि कठोर कारवाईची गरज आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि आम्हाला न्यायाची आशा आहे, असे ते म्हणाले.
तुषार गांधी यांच्यासोबत पोलीस ठाण्यात आलेले वकील असीम सरोदे म्हणाले, “आम्ही भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 499, 153(a), 505 अन्वये इतर संबंधित कलमांसह गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
.