Wednesday, June 18, 2025
Homeआरोग्यविषयकमहाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या दिशेनं..? आकडेवारी मांडत तज्ज्ञांनी दिले संकेत

महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या दिशेनं..? आकडेवारी मांडत तज्ज्ञांनी दिले संकेत

१३ जूलै २०२१,
जुलै महिन्याच्या पहिल्या अकरा दिवसांमध्ये महाराष्ट्रात करोनाचे ८८ हजार १३० रुग्ण आढळून आले. ह्या आकडेवारीमुळे आता तज्ज्ञांकडून करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त कऱण्यात येत आहे. करोनारुग्णांच्या संख्येत झालेली ही वाढ करोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात आलेल्या करोनाच्या आधीच्या दोन लाटांप्रमाणेच ह्याही लाटेचं स्वरुप आता दिसून येत आहे.

दिल्लीत दुसऱ्या लाटेदरम्यान २५ हजार नवे बाधित आढळून आले होते. मात्र १ जुलै ते ११ जुलै या कालावधीत केवळ ८७० रुग्ण आढळून आले आहेत. केरळ हे एकमेव राज्य असं आहे जिथे महाराष्ट्रापेक्षाही जास्त करोना रुग्णांची संख्या आहे. गेल्या ११ दिवसांमध्ये केरळमध्ये १ लाख २८ हजार ९५१ नव्या बाधितांची नोंद झाली.

महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ११ दिवसांमध्ये ३००० हून अधिक रुग्णांची नोंद झाली तर गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतली रुग्णसंख्या ६००च्याही खाली आली आहे. करोनासाठीच्या विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात की, कोल्हापूरमधली परिस्थिती काहीशी विचित्र आहे. तिथे लसीकरणाचे आकडेवारी सर्वाधिक आहे मात्र करोनाबाधित आढळण्याचा दर म्हणजेच पॉझिटिव्हिटी रेटही सर्वात जास्त आहे.

जोशी पुढे म्हणतात, सध्या करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका आहे. करोना प्रतिबंधक नियमांचं पालन न करणं आणि लसीकरणाचा मंदावलेला वेग यामुळेच हा धोका निर्माण झाला आहे. कंटाळ्या किंवा सक्ती केल्यामुळे लोक घरात राहायलाच तयार नाहीत. तसंच मास्क आणि स्वच्छता तसंच इतर नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे या विषाणूचं फावतं आणि त्याला प्रसार व्हायला संधी मिळते आहे.

दोन्ही लाटा जेव्हा आपल्या सर्वोच्च बिंदूला होत्या त्यादरम्यान सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातच आढळून आले आहेत. आता महाराष्ट्रात वाढणारी रुग्णसंख्याही अशाच प्रकारची दिसून येत आहे. फोर्टीस हिरानंदानी रुग्णालयाचे डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितलं की, दुसऱ्या लाटेच्या शेवटी मुंबई आणि महाराष्ट्रातली करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली होती. मात्र जुलैच्या पहिल्या १० दिवसांमध्ये ही संख्या कमालीची वाढली आहे. या काळात राज्यात ७९ हजार ५०० नवबाधितांची नोंद झाली आहे.

तज्ज्ञांनी सांगितलं की जुलैमध्ये वाढलेली करोनाबाधितांची संख्या हा धोक्याचा इशारा आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी बाधितांचा उच्चांक दिसून आला आहे. मात्र, सर्वसाधारणपणे सध्या हा विषाणू सक्रिय आहे एवढं मात्र नक्की!

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments