Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीमहाराष्ट्र राज्य मंडळाने HSC, SSC च्या 2025 च्या परीक्षेच्या तारखा केल्या जाहीर

महाराष्ट्र राज्य मंडळाने HSC, SSC च्या 2025 च्या परीक्षेच्या तारखा केल्या जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) मोठी घोषणा केली आहे. दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे प्रसिद्धीपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केली जाते.

विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा विचार करुन सन 2025 ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा 18 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजन असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा :

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी, 2025 ते मंगळवार, दि. 18 मार्च 2025

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : शुक्रवार, दि. 24 जानेवारी 2025 ते सोमवार, 10 फेब्रुवारी 2025

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा : शुक्रवार, दि. 21 फेब्रुवारी, 2025 ते सोमवार दि. 17 मार्च, 2025

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : सोमवार, 03 फेब्रुवारी 2025 ते गुरूवार, 20 फेब्रुवारी 2025

सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर होणार

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसह विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2025 च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

मंडळानं दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या 23 ऑगस्ट पर्यंत कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments