राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होणार की कठोर निर्बंध लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात लॉकडाऊन करण्यावरून मतभेद पहायला मिळत असून अनेकांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन करणे हे राज्याच्या हिताचे नसून, राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह ‘मिनी लॉकडाऊन’ चा विचार सध्या सुरू आहे.
सर्वात जास्त गर्दीची ठिकाणे जसे मॉल, थिएटर्स, धार्मिक स्थळे, प्ले ग्राऊंडस, गार्डन्स आणि पिकनिक पॉईंट्सवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता आहे. या ठिकाणांवर प्रशासन कडक निर्बंध लावण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यात रात्रीची संचारबंदी अनेक जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. पुण्यात उद्यापासून (3 एप्रिल) संध्याकाळी सहा ते सकाळी सहा अशी संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच सर्व धार्मिक स्थळे, मॉल, थिएटर्स, हॉटेल्स, बार पुढील सात दिवस पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. कोणतेही कार्यक्रम घेण्यास या काळात मज्जाव असणार आहे. तसेच विवाहसमारंभासाठी केवळ 50 जणांना तर अंत्यविधीसाठी 20 जणांना परवाणगी देण्यात आली आहे.