महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली आहे. दुपारी बाराच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या परिसरामध्ये दाखल झाले होते.
११ मार्च रोजी उद्धव यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर बरोबर २८ दिवसांनी त्यांनी आज लसीचा दुसरा डोस घेतला. मुख्यमंत्र्यांनी कोव्हिशिल्ड या लसीचे डोस घेतले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच पुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आदित्य हे होम क्वारंटाइन असून रश्मी ठाकरेंवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ‘लसीबद्दल मनामध्ये भिती आणि संभ्रम ठेऊ नका. मनात कोणतीही शंका न ठेवता लस टोचून घ्या,’ असं आवाहन उद्धव यांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी नरेंद्र मोदी सकाळीच एम्स रुग्णालयात पोहोचले होते. मोदींनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. याआधी १ मार्चला मोदींनी लसीचा पहिला डोस घेतला होता.