Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमीदिलीप वळसे पाटील गृहमंत्रीपदी विराजमान; ‘प्रशासनात राजकीय हस्तक्षेप राहणार नाही’, असा विश्वास...

दिलीप वळसे पाटील गृहमंत्रीपदी विराजमान; ‘प्रशासनात राजकीय हस्तक्षेप राहणार नाही’, असा विश्वास व्यक्त केला!

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कथित १०० कोटी प्रकरणी आरोप झाल्यामुळे राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी गृहमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आज गृहमंत्री पाटील यांनी आपला कार्यभार सांभाळताच आपली दिशा स्पष्ट केली आहे. “पोलीस दलाचं सक्षमीकरण करण ही एक महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने पावलं टाकणं आवश्यक आहे. स्वच्छ प्रशासन देण्याच्या दृष्टीने माझं काम राहील. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप माझ्याकडून राहणार नाही. बदल्यांच्या बाबतीत जी व्यवस्था ठरली आहे, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. माझ्या दृष्टीने प्रस्तावित शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणं, पोलीस हाऊसिंगसाठी घरं बांधून घेणं या गोष्टी करायच्या आहेत”, असं गृहमंत्री पाटील म्हणाले.

“उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, सीबीआय-एनआयएची चौकशी यामध्ये राज्य सरकारचं पूर्ण सहकार्य राहील. मात्र, न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे”, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

“काळ आव्हानात्मक आणि अवघड आहे. कोरोनामुळे सर्व पोलीस दल रस्त्यावर किंवा फील्डवर कार्यरत आहे. पोलीस दलाचं काम कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच कोरोना काळातल्या बंधनांची अंमलबजावणी करणं ही जबाबदारी देखील पोलीस विभागावर आहे. याच महिन्यात गुढी पाडवा, रमजान, आंबेडकर जयंती, राम नवमी आहे. हे दिवस त्या त्या धर्मीयांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहेत. सगळ्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा त्यात आहेत. कोरोनाचा अंदाज पाहिला, तर या महिन्यात परिस्थिती अधिक आव्हानात्मक असणार आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळायला हवा आणि पोलीस दलाबाबत विश्वास वाटायला हवा, यासाठी सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहील”, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments