७ जानेवारी २०२०,
नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पुण्यातील बालेवाडीत पार पडलेल्या ६३व्या कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेवर ३-२ने विजय मिळवत हा किताब पटकावला आहे. हर्षवर्धनचा विजय होताच मैदानात एकच जल्लोष करण्यात आला. हर्षवर्धननेही विजयी होताच खिलाडीवृत्तीचं दर्शन घडवत उपविजेत्या शेळकेला खांद्यावर घेऊन त्याचं अभिनंदन केलं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची गदा देऊन गौरविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही पैलवान पुण्याच्या काका पवारांच्या तालमितील आहेत.
बालेवाडीत ६३व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. कालच्या सामन्यात गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफिक शेख आणि उप महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांचा धक्कादायक पराभव झाला होता. त्यामुळे आज नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर आणि लातूरच्या शैलेश शेळकेमध्ये होणाऱ्या अंतिम लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत:उपस्थित होते. पवार यांच्या उपस्थितीतच हा सामना रंगला.
सामना सुरू होताच हर्षवर्धनने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत शैलेश शेळकेवर वरचष्मा गाजवला. या चित्तथरारक स्पर्धेत हर्षवर्धनने शैलेशवर ३-२ने मात करत ‘महाराष्ट्र केसरी’पद खिशात घातलं. हर्षवर्धन सदगीर विजयी होताच मैदानात एकच जल्लोष करण्यात आला. त्या विजेता ठरला पैलवान हर्षवर्धन सदगीर परंतु याने उप-विजेता पैलवानास शैलेश शेळके यास खांद्यावर घेऊन जमलेल्या सर्व कुस्तीप्रेमींनी नमन केले. हा क्षण डोळ्यांचे पारणे फेडणारा होता… हर्षवर्धनच्या सहकाऱ्यांनी त्याला खांद्यावर घेऊन संपूर्ण मैदानातून त्याची मिरवणूक काढली. त्यानंतर हर्षवर्धनला शरद पवार यांच्या हस्ते मानाची गदा देऊन गौरविण्यात आले. यावेळी बाळासाहेब लांडगेही उपस्थित होते.