उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी; राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये साहित्यिक उपक्रमांचे आयोजन बंधनकारक
मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १ ऑगस्ट या जयंतीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा करण्याचा आदेश जारी केला आहे. यासंदर्भातील शासन परिपत्रक २९ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आले असून, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस उत्साहात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्याला दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषा आणि साहित्याला जागतिक स्तरावर नवे स्थान मिळाल्याचे नमूद करत, विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण करणे, साहित्य वाचनाला चालना देणे आणि नवोदित लेखक घडविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या ‘लेखन प्रेरणा दिना’निमित्त राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये कविता, कथा, निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा, स्थानिक साहित्यिकांची व्याख्याने, ग्रंथदिंडी, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे वाचन, त्यांच्या साहित्यावर चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा तसेच साहित्य संमेलनांचे आयोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
तसेच उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि कला विभागाच्या संचालकांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शैक्षणिक संस्थांना हा दिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याबाबत आवश्यक सूचना देण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक वारशातून विद्यार्थ्यांना लेखनाची प्रेरणा मिळावी, समाजाभिमुख साहित्यनिर्मितीला चालना मिळावी आणि वाचन-लेखन संस्कृती अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


