नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून त्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून पर्यावरण पूरक साधनांचा वापर करणे गरजेचे आहे, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
हवेतील प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच हवेची दैनंदिन प्रदूषण पातळी तपासण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि परिसर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे फुफ्फुसाचे बिलबोर्ड (वायू गुणवत्ता दर्शक फलक) बसविण्यात आले असून या बिलबोर्डचे अनावरण आयुक्त तथा प्रशासक शेखर सिह यांच्या हस्ते करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, उपआयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक विनोद जळक, कार्यकारी अभियंता अनिल भालसाखळे, प्रा. डॉ.दिपाली गायकवाड, उपअभियंता सोहम निकम, योगेश अल्हाट, परिसर संवर्धन संस्थेचे रणजीत गाडगीळ, श्वेता वेर्णेकर, शर्मिला देव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, थर्मोमिटर जसे शरीरातील ताप दर्शवते तसेच बिलबोर्ड वायुतील प्रदूषण दर्शवते, बिलबोर्ड बसवणे हा महापालिकेचा वेगळा उपक्रम असून शहरामध्ये विविध ठिकाणी असे बिलबोर्ड बसविण्याचा महापालिकेचा मानस आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
परिसर संस्थेच्या शर्मिला देव म्हणाल्या, परिसर संस्था अनेक वर्षांपासून हवा प्रदूषण कमी व्हावे यासाठी काम करीत आहे. हवेतील मुख्य व घातक प्रदूषके असलेल्या पीएम२.५ आणि पीएम१० मध्ये अनुक्रमे ७०% आणि ६१% एवढी मोठी वाढ मागील सहा वर्षांमध्ये झालेली आहे. आपल्या आरोग्यासाठी महासंकट ठरणारी परिस्थिती आपल्या वातावरणात आहे, परंतु सर्वसामान्य नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत, असे त्यांनी सांगितले.
डॉ. दिपाली गायकवाड म्हणाल्या, हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. श्वसनमार्गाच्या आजारांप्रमाणे उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार आणि विविध प्रकारचे कर्करोग संभवतात. हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम कायमस्वरूपी असतात, ते उपचाराने बरे करता येत नाहीत, त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बसविण्यात आलेल्या फुफ्फुसाच्या बिलबोर्डमध्ये फुफ्फुसांची भव्य प्रतिकृती पांढऱ्या फिल्टरपासून बनवलेली आहे. आपल्या श्वासावाटे परिसरातील हवा शरीरातील फुफ्फुसांमध्ये जाते, त्याच प्रकारे या प्रतिकृतीच्या मागच्या बाजूला पंख्यांची जोडी लावली असून त्याद्वारे हवा आत खेचली जाते. पंख्यांच्या या हालचालींमुळे विविध स्रोतातून हवेत पसरणारे पार्टिक्युलेट मॅटर हे प्रदूषक या प्रतिकृतीमध्येही जाईल. पुढील काही दिवसात वा आठवड्यात त्याचे परिणाम ठळकपणे दिसून येतील, म्हणजे फुफ्फुसाच्या प्रतिकृतीचा पांढरा रंग आधी तपकिरी व नंतर काळा होईल. परिसरातील हवेची गुणवत्ता त्या त्या वेळी कशी आहे हा ‘हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक’ दाखवणारा डिजिटल मॉनिटर या प्रतिकृतीसोबतच लावण्यात आलेला आहे.
शहरातील नागरिकांनी या प्रतिकृतीला भेट द्यावी असे आवाहन परिसर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. समाजमाध्यमातून हा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. तसेच लोकप्रतिनिधींनाही प्रतिकृती बघायला आमंत्रित केले आहे, ज्यामुळे हवा प्रदूषणाच्या समस्येची तीव्रता त्यांच्याही लक्षात येईल आणि त्यावर आवश्यक कृतीची पाऊले उचलण्याचे नियोजन केले जाईल.