मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा फोन आल्याने संपूर्ण राज्याची सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाली होती. गृहमंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. या बातमीने संपूर्ण राज्याचं टेन्शन वाढलं होतं. मात्र, ही माहिती खोटी असल्याचं आता पुढे आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करणाऱ्या कटाची खोटी माहिती देणाऱ्या एकाला लोणावळ्यातून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव अविनाश वाघमारे असे असून तो मूळचा आटपाडी येथील रहिवासी आहे. लोणावळा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र, त्यानं असं का केलं यामागील कारणही तेवढंच विचित्र आहे.
१० रुपयांची बाटली १५ रुपयांना विकली…
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा दारूच्या नशेत असताना लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्याने हॉटेलमधून पाण्याची बाटली विकत घेतली. मात्र हॉटेल मालकाने १० रुपयांची बाटली त्याला १५ रुपयांना दिली. जास्त किंमत लावणल्याचा राग मनात धरून हॉटेल मनेजर आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा उद्देशाने त्याने पोलिसांना फोन करून ही खोटी माहिती दिली. अविनाश आप्पा वाघमारे असं या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्लॅन चालू आहे, ही खोटी माहिती दिली असल्याचं अविनाश आप्पा वाघमारे याने पोलिसांना सांगितलं आहे. त्याच्यावर कलम १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याला कलम १४९ नुसार सोडण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी २.४८ वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यातील जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील साईकृपा हॉटेल येथे अविनाश वाघमारे हा गेला होता. यावेळी वाघमारे याने पाण्याची बाटली घेतली होती. पिण्याच्या पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावली या कारणावरुन दारूच्या नशेत असलेल्या अविनाश वाघमारे याला राग आला. त्यानंतर वाघमारे याने हॉटेलचे व्यवस्थापक किशोर पाटील आणि कर्मचारी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने विनाकारण त्याच्या मोबाईल क्रमांकावरुन १०० नंबरला निनावी फोन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा कट चालू असल्याचे सांगितले. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती.