स्थानिक प्रश्नांपासून राज्यव्यापी मुद्द्यांपर्यंत शासनाचे लक्ष वेधले
पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवडचे आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत स्थानिक तसेच राज्यस्तरीय अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडत शासनाचे लक्ष वेधले. शनिवार, १९ जुलै रोजी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आ. गोरखे यांनी पिंपरी चिंचवडच्या प्रारूप विकास आराखड्यातील त्रुटींवर टीका करत आराखडा रद्द करण्याची मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पोलीस स्टेशनचे आरक्षण रद्द करून तेथे नियोजित माता रमाई आंबेडकर स्मारक उभारण्याची मागणीही त्यांनी केली. वायसीएम व यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आयुर्वेदिक उपचार पुन्हा सुरू करावेत, कलाकारांचे नुकसान होऊ नये म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम रद्द होण्यावर धोरण तयार करावे, अशी ठोस भूमिका त्यांनी घेतली.
राज्यस्तरावर, त्यांनी ‘प्रतिभा सेतू’ योजना एमपीएससीसाठी राबवण्याची, तसेच धर्मांतरित अनुसूचित जातींच्या सवलती रद्द करण्याची मागणी केली. ई-गव्हर्नन्सद्वारे रिक्त पदे तात्काळ भरून जुनी पेन्शन योजना पुनरुज्जीवित करण्याचा आग्रह धरला.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना ‘भारत रत्न’ देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी, असे स्पष्ट करत महामंडळासाठी रखडलेला निधी तातडीने मंजूर करावा, अशीही त्यांनी मागणी केली.
स्मशानभूमीत होणाऱ्या जातीय भेदभावांविरोधात कठोर कारवाई, बालगुन्हेगारी व सोशल मीडियावरील गैरवापर रोखण्यासाठी कठोर कायदे, भटक्या श्वानांवर नियंत्रणासाठी धोरण, व पीएमपी बसमध्ये सुरक्षाव्यवस्था सुधारण्याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली.
विधान परिषदेत तालिका सभापती पदाचा सन्मान मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, माधुरी मिसाळ आदींनी आपले प्रश्न गांभीर्याने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, महिला मोर्चा अध्यक्ष शहराध्यक्ष सुजाताताई पालांडे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी राजेश पिल्ले, महेश कुलकर्णी, ॲड. मोरेश्वर शेडगे, पिंपरी चिंचवड सरचिटणीस संजय मंगोडेकर, शितल शिंदे, प्रवक्ता राजू दुर्गे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, मंडल अध्यक्ष धर्मा वाघमारे, अनिता वाळुंजकर आणि मंगेश धाडगे, प्रभाग स्वीकृत सदस्य वैशाली खाड्डये, संजय कणसे, सागर फुगे, धर्मेंद्र क्षीरसागर, देवदत्त लांडे, प्रतिभा जवळकर, मारुती जाधव, गणेश लंगोटे, बापू घोलप, प्रताप सूर्यवंशी, अतुल इनामदार, शाकीर शेख, बाळा शिंदे किसन शिंदे, दीपक भंडारी आदी उपस्थित होते.


