अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाला पूरक वातावरण निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणजे पुणे शहर आणि परिसरात काल रात्री हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. तर पुढील सहा दिवस शहरात दुपारनंतर हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुढील आठवडाभर पावसाचा अंदाज
दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर ही स्थिती अशीच कायम राहणार असून किमान तापमानात चढ उतार देखील पाहायला मिळेल. राज्यात पुढील चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. राज्यातील किनारपट्टी भागामध्ये सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात ढगाळ वातावरण
पुण्यात आज वातावरण ढगाळ राहणार असून, मेघगर्जनेसह विजेच्या कडकडात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुरुवारी देखील हवामान ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. पुढील चार दिवस रविवारपर्यंत पुण्यातील वातावरण ढगाळ राहणार असून , पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
गेल्या 24 तासांमध्ये कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यमस्वरुपाचा पाऊस पडला आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यामध्ये मात्र हवामान कोरडे होते. वातावरण ढगाळ असल्याने गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील सरासरी तापमानात वाढ झाली आहे. तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे. पुढीच चार दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.