महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका या संस्थेतर्फे साहित्यातील योगदानासाठी दिला जाणारा दिलीप वि. चित्रे जीवनगौरव पुरस्कार यंदा निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना तर समाजसेवेच्या क्षेत्रातील योगदानासाठीचा जीवनगौरव पुरस्कार अन्नपूर्णा परिवाराच्या प्रेमाताई पुरव यांना जाहीर झाला आहे. साधना ट्रस्टचे विनोद शिरसाठ, मासूमचे रमेश अवस्थी आणि निवड समितीच्या सदस्य सुनीती सु. र. यांच्या उपस्थितीत २०२१ च्या पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली.
महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे साहित्य आणि समाजसेवा क्षेत्रात यंदा ११ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सिरसा, हरियाणा येथील अंशुल छत्रपती यांना जाहीर झाला आहे. छत्रपती यांनी बाबा राम रहीमच्या अत्याचार आणि खुनांना वाचा फोडली. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रातील विशेष पुरस्कार राम जगताप यांना, वाङ्मयप्रकार पुरस्कार संतोष शिंत्रे यांना जाहीर झाला आहे. ‘दगडीमक्ता’ या कादंबरीचे लेखक रमेश अंधारे यांची ललित ग्रंथ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
रमेश अंधारे यांच्या दगडी मक्ता या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार, मुक्ता बाम यांना नाटय़ क्षेत्रातील नवोदित व्यक्तीला दिल्या जाणारा, रा. शं. दातार नाट्य पुरस्कार, डॉ. सिसिलिया कार्व्होलो यांच्या टिपंवणी या साहित्यकृतीला अ-पारंपारिक-वैचारिक ग्रंथ पुरस्कार, सुरेश सावंत यांना कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार, सुनीता भोसले यांना कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार देण्यात येणार आहे. पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. पंचवीस हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपाचा युवा पुरस्कार युवराज गटकळ यांना देण्यात येणार आहे.
करोनातील निर्बंधांचे स्वरूप विचारात घेऊन कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत निर्णय घेतला जाईल, असे विनोद शिरसाठ यांनी स्पष्ट केले. पुरस्काराची रक्कम सन्मानार्थीच्या बँक खात्यात तातडीने जमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केल़े.