विधिमंडळाच्या आज, मंगळवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण लागू करण्याबाबतचा कायदा करण्यात येणार आहे. मराठा समाजाची लोकसंख्या २७ टक्के असल्याचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिला असून त्याआधारे स्वतंत्र संवर्ग करून १० टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. दुसरीकडे ओबीसीच नव्हे, तर अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी गडावर दिली.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आठवडाभरापासून उपोषण करीत आहेत. त्यामुळे विधिमंडळाचे नियोजित अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार असतानाही सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलाविले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत अहवाल सरकारला नुकताच सादर केला आहे. यापूर्वी दोनदा केलेला मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयात टिकला नव्हता. या पार्श्वभूमीवर आता होणारा कायदा टिकविण्याचे महायुती सरकारसमोर आव्हान असेल. दरम्यान, ओबीसीच नव्हे, तर इतर कोणत्याच समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, कुणाचेही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाणार मुख्यमंत्री शिंदे.
२७ टक्के लोकसंख्या
आयोगाने राज्यभरात दहा दिवसांत विविध मुद्द्यांवर विस्तृत सर्वेक्षण करून त्याआधारे सरकारला अहवाल दिला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या वेळी सरकारने माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या समितीमार्फत शास्त्रीय सांख्यिकी तपशील (इंपिरिकल डेटा) गोळा केला होता. त्यावेळी राज्यात ओबीसींची लोकसंख्या २७ टक्के असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणात मराठा समाजाची लोकसंख्या २७ टक्के असल्याचा निष्कर्ष काढला आहे.