विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे विजयी झाली आहेत. त्यामुळे शहराला पाचवा तर भाजपला चौथा आमदार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व वाढले आहे.
चिंचवडच्या अश्विनी जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे हे भाजपचे आमदार आहेत. तर, भाजपच्याच उमा खापरे विधानपरिषदेत आमदार आहेत. आता गोरखे हे विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे गोरखे यांच्या रुपाने भाजपला चौथा तर शहराला पाचवा आमदार मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे पिंपरीचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
भाजपने शहरात दोन विधानपरिषदेचे आमदार देऊन वेगळा संदेश दिला आहे. 2014 पासून भाजपने पिंपरी-चिंचवडवर विशेष लक्ष दिले असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी अमर साबळे यांना राज्यसभेची खासदारकी दिली. सचिन पटवर्धन यांना राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्षपद, सदाशिव खाडे यांना तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद आणि अमित गोरखे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे यांच्याकडे महिला मोर्चाचे अध्यक्षपद दिले होते. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवरही संधी दिली. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि भोसरीत महेश लांडगे भाजपचे आमदार असून आता गोरखे यांच्या रूपाने पक्षाचे चार आमदार झाले.