चित्रपट, मालिका, वेब सिरीज, जाहिरात यासह इतर मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना आता कायद्याचे पाठबळ मिळाले असून कामगार विभागाने यासाठी मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. या क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन, कामाचा करारनामा, बोनस, उपदान प्रदान, भविष्य निर्वाह निधी, भारतीय कर्मचारी विमा योजना, बालकांची सुरक्षितता आदी नियम लागू केले आहेत. कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभही दिला जाणार आहे.
चित्रपट, मालिका व इतर मनोरंजन कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून अनेकदा कलाकार, तंत्रज्ञ व कामगारांचे वेतन थकविण्याचे प्रकार घडत असतात. यासंदर्भात विविध कामगार संघटनांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी कामगार विभागाने २०२१ व २०२२ मध्ये चित्रपट निर्माते, तंत्रज्ञ, कलाकार दिग्दर्शक आणि मनोरंजन क्षेत्रातील कामगार संघटना यांच्यासोबत चर्चा करून सर्वंकष कार्यप्रणाली तयार केली आहे.
सदरची मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी चित्रपटसृष्टीतील सर्व मालक, निर्माते, कामगार, सह कलाकार, तंत्रज्ञ तसेच कामाच्या स्वरुपानुसार काम करणाऱ्या सर्व संबंधितांवर बंधनकारक आहे.
कार्यप्रणाली कुणाला लागू
मानक कार्यप्रणाली ही राज्यातील चित्रपट, दूरचित्रवाणीदर्शन मालिका, जाहिरात विभाग, डिजिटल उद्योग व इतर असंघटित करमणूक क्षेत्रातील विभागांमध्ये काम करणारे व्यावसायिक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, ॲक्शन ॲण्ड स्टंट दिग्दर्शक, कलावंत (सर्व प्रकारचे अभिनय करणारे कलाकार, सह कलाकार, नायक, नायिका, सह नायक, सहनायिका, गायक, व्हाइस एडिटर, लेखक, बाल कलाकार इ. तंत्रज्ञ ध्वनी मुद्रण करणे, एडिटिंग करणे, साऊंड रेकॉर्डिस्ट, हेड कॅमेरामन इ. कामगार, (रंगमंच उभारणारे कामगार म्हणजेच हेड टेपिस्ट, असिस्टंट टेपिस्ट, हेड पेंटर,पेंटर, कारपेंटर, हेड कारपेंटर, असिस्टंट कारपेंटर, पॉलिशमन, पीस मोल्डर, मोल्डर, कास्टर, लाईटमन, स्पॉट बाय, प्रॉडक्शन बॉय, क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, जनरेटर ऑपरेटर, हेल्पर, फोटोग्राफर्स, साऊंड इंजिनिअर्स, स्टंट आर्टिस्ट, सहायक कोरस गायक /गायिका, महिला/ पुरुष सह कलाकार, सिने वेशभूषा व मेकअप आर्टिस्ट, ॲक्शन डबिंग इफेक्ट आर्टिस्ट, नर्तक (देशी, परवानगी धारक विदेशी), ज्युनिअर आर्टिस्ट, छायाचित्रकार,ड्रेस मन, बॅकस्टेज आर्टिस्ट, तृतीयपंथी भूमिका करणारे कलावंत) बालकलाकार व इतर तत्सम स्वरूपाचे काम करणारे कामगार, कर्मचारी,तंत्रज्ञ, तसेच असंघटित क्षेत्रातील शासनाने घोषित केलेल्या ३०० प्रकारचे उद्योग व्यवसायाच्या यादीमधील क्र. ६५ ते क्र ७७ नुसार करमणूक व संबंधित काम करणारे कामगार जसे की; दृकश्राव्य कामाशी संबंधित कामगार वाजंत्री कॅमेरामन सिनेमाशी संबंधित कामे सिनेमा प्रक्षेपणा संबंधित कामे सर्कस कलाकार नर्तक गोडीस्वारा जादूगार मॉडेल कवी लेखक इत्यादींना लागू राहील त्याचबरोबर दूरदर्शन मालिका निर्मिती, लघुपट निर्मिती, वेब सिरीज निर्मिती, जाहिरात पटनिर्मिती, ऑडिओ व्हिज्युअल अल्बम निर्मितीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना देखील ही मानक प्रणाली लागू राहील.