रणरणत्या उन्हात आकाशाची सावली, मला लाभली… त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर. माझ्या कवितेत लतादीदींचे स्वर, संगीताचा परिचय होता. हीच संगीताची परिभाषा, संगीताची व्याख्या होती. लतादीदी म्हणजेच संगीत आणि संगीत म्हणजेच लतादीदी. माझ्या कवितेला समानार्थी शब्द आहेत दोन्ही गोष्टी… अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ, लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपली भावना व्यक्त केली आणि तुडुंब भरलेल्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या सभागृहामध्ये टाळ्या निनादत राहिल्या.
बुधवार, २४ एप्रिल रोजी ८२ व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळ्यामध्ये अमिताभ बच्चन यांना तिसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यानिमित्ताने लता मंगेशकरांच्या आठवणी जागवत त्यांनी आपल्या मित्राच्या मदतीने खास मराठी कवितेच्या आधारे या पुरस्काराबद्दलची भावना व्यक्त केली. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्टस् यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लता मंगेशकर यांचा स्वर हा आत्म्याला परमात्म्याशी जोडणारी तार आहे. त्यांचा आवाज ऐकल्यावर आत्म्याला परमात्म्याशी जोडले गेले आहे याची जाणीव ऐकणाऱ्याला नक्की होते, असेही बच्चन यांनी यावेळी सांगितले. लता मंगेशकर म्हणजे मधाची धार आहेत, असे वर्णन त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन यांनी केले होते. मधाची धार सतत प्रवाही असते तसाच लता मंगेशकर यांचा सूरही कधी तुटत नाही असे सांगताना लता मंगेशकर यांनीच ८० च्या दशकात पहिल्यांदा व्यासपीठावर गाण्याची संधी दिली होती याचीही आठवणही बच्चन यांनी यावेळी सांगितली.
कलाकारांचा सन्मान
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिसोहळ्यामध्ये प्रदीर्घ संगीत सेवेसाठी प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांना सन्मानित करण्यात आले. प्रदीर्घ नाट्य-चित्रपट सेवेसाठी ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्यामध्ये अभिनेता रणदीप हुड्डा यांना उत्कृष्ट चित्रपटनिर्मितीसाठी मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात प्रदीर्घ नाट्य सेवेसाठी अतुल परचुरे यांना, प्रदीर्घ चित्रपट सेवेसाठी पद्मिनी कोल्हापुरे यांना, प्रदीर्घ संगीत सेवेसाठी लोकप्रिय गझलगायक रुपकुमार राठोड यांना, प्रदीर्घ पत्रकारितेसाठी भाऊ तोरसेकर यांना गौरवण्यात आले. उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी गालिब या नाटकासाठी मोहन वाघ पुरस्कार चिन्मय मांडलेकर यांना देण्यात आला तर प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी वाग्विलासिनी हा पुरस्कार मंजिरी फडके यांना देण्यात आला. समाजसेवेसाठी देण्यात येणारा आनंदमयी हा पुरस्कार देऊन दीपस्तंभ फाऊंडेन मनोबल या संस्थेला गौरवण्यात आले. संस्थेतर्फे यजुर्वेंद्र महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारार्थींनी हा दिवस आणि हा पुरस्कार खूप आनंद देणारा असल्याची भावना व्यक्त केली. उषा मंगेशकर यांनी पुरस्कारार्थी तसेच उपस्थितांचे आभार मानले.