३१ मार्च २०२१,
ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत. अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी फेसबुक च्या माध्यमातून हॉस्पिटल मधील फोटो शेअर करत दिली.
तत्पूर्वी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. पवार यांनी मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पवार यांना आज रुग्णालयात दाखल करुन त्यांची एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र मंगळवारी रात्रीच पवार यांच्या पोटात जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्रीच पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
सोमवारी पहिल्यांदाच शरद पवार यांना गॉल ब्लँडरचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी पवारांना बुधवारी रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया करण्याचं ठरवण्यात आलेलं. मात्र अधिक त्रास जाणवू लागल्याने मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या पित्ताशयातील खडा यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला असून पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलीय.
या शस्त्रक्रियेसंदर्भातील ब्रीच कँडीमधील डॉक्टर अमित मायदेव यांनीही एएनआयशी बोलताना सविस्तर माहिती दिली. “काही चाचण्या केल्यानंतर आम्ही त्यांच्यावर आजच (मंगळवारी) रात्री शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. काही कॉम्पलिकेशन्स निर्माण झाल्याने आम्ही लगेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पित्तशय काढायचे की नाही याचा निर्णय आम्ही नंतर घेणार आहोत. सध्या ते देखरेखीखाली आहेत,” असं डॉक्टर मायदेव यांनी सांगितलं आहे.