३ एप्रिल २०२१,
भारतात करोनाची दुसरी लाट आली असून, पहिल्या लाटेपेक्षाही अधिक वेगानं नागरिक संक्रमित होत असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांतच रुग्णसंख्या जवळपास आठ ते नऊ हजारांनी वाढली असून, जवळपास ९० हजार नवीन करोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. २४ तासांच्या कालावधीत मृतांचा आकडा अडीचशेने वाढला आहे. त्यामुळे करोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचं समोर येऊ लागलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. देशात मागील २४ तासांत ८९ हजार १२९ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ४४ हजार रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. या कालावधीत देशात ७१४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या देशात ६ लाख ५८ हजार ९०९ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६४ हजार ११० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात गुरूवारी ८१ हजार ४६६ रुग्ण आढळून आले होते. तर ४६९ जणांचा मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी ७१४ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच २४ तासांच्या कालावधीत मृतांची संख्येत २५० ने वाढ झाली आहे. गुरुवारी झालेली रुग्णवाढ मागील सहा महिन्यातील उच्चांकी वाढ होती. त्यानंतर हा उच्चांकही मोडीत निघाला आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.