१८ नोव्हेंबर २०२०,
खाजगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँक आर्थिक संकटात सापडल्यानंतर आरबीआयने या बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे. लक्ष्मी विलास बँक आता डीबीएस बँक इंडिया लिमिटेड मध्ये विलीन होणार आहे. या घटनेचा ग्राहकांवर महत्त्वाचा परिणाम होत आहे. आरबीआयने केंद्र सरकारशी केलेल्या सल्ला मसलतीनंतर लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध आणले आहेत. आता खातेदार बँकेतून 25 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढू शकणार नाहीत. 30 दिवसांसाठी हे निर्बंध असतील.
दरम्यान ही बातमी समजताच LVB खातेधारकांनी बँकेच्या मुंबईतील शाखेबाहेर गर्दी केली आहे. अंधेरी शाखेबाहेर जमा झालेल्या ग्राहकांशी संपर्क साधला असता अशी माहिती मिळते आहे की, खातेधारक याठिकाणी पैसे काढण्यासाठी जमा झाले आहेत. काल उशिरा या घटनेबाबत समजल्यानंतर खातेधारक आज बँकेकडून याबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी पैसे काढण्यासाठी जमा झाले आहेत. खातेधारकांची अशी तक्रार आहे की 25 हजारांमध्ये महिना चालवणे कठीण आहे.
LVB चं संचालक मंडळ रिझर्व बँकेने बरखास्त केलं होतं. कारण त्यांच्याकडे बँकेला पुनरुज्जीवन देणारा कुठलाही प्लॅन नव्हता. मात्र विलीनीकरणामुळे लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरीही खातेधारकांमध्ये या एकंदरित घटनांबाबत संभ्रम कायम आहे. या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी आणि खात्यातून पैसे काढण्यासाठी खातेधारकांनी बँकेबाहेर गर्दी केली आहे.

लक्ष्मी विलास बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली आहे, असं लक्षात आल्यानंतर रिझर्व बँकेने केंद्र सरकारशी चर्चा सुरू केली. रिझर्व बँकेच्या सल्ल्याने अर्थ मंत्रालयाने यासंबंधी बँकेला नोटीस देऊन आता सरकारने या बँकेवर 16 डिसेंबरपर्यंत निर्बंध आणले होते. बँक दिवाळखोरीत निघण्याच्या जवळ पोहोचू नये, यासाठी असे कठोर निर्णय आवश्यक असल्याचं सांगितलं जातं. सध्या कॅनरा बँकेचे माजी कार्यकारी अध्यक्ष टी. एन. मनोहरन यांंना लक्ष्मी विलास बँकेवर प्रशासक म्हणून नेमण्यात आलं आहे.
लक्ष्मी विलास बँकेचं मुख्यालय चेन्नई इथे आहे. खासगी क्षेत्रातली महत्त्वाची बँक म्हणून LVB ओळखली जात असे. गेल्या काही महिन्यात अशा प्रकारे कारवाईवा सामोरी जाणारी LVB ही दुसरी मोठी बँक आहे. 5 मार्च 2020 ला अशाच प्रकारे येस बँकेवर निर्बंध आणले होते. पण पुढे स्टेट बँकेच्या (SBI) सहयोगाने ही बँक वाचवण्यात आली. यापूर्वी खासगी क्षेत्रातली ग्लोबल ट्रस्ट बँकसुद्धा बुडितखात्यात निघाली होती. शेवटी ती ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये विलीन करण्यात आली.
2019 पासून LVB चा संकटकाळ सुरू झाला. इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्समध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व बँकेने फेटाळून लावला होता. शेअर होल्डर्सनीसुद्धा बँकेच्या संचालक मंडळातल्या बहुतांश संचालकांविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता.