Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रभीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायांची अलोट गर्दी

भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायांची अलोट गर्दी

नववर्षाचा पहिला दिवस आणि शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला लाखो आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी अभिवादन केले. विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पंचक्रोशीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणांहून अनुयायी आले आहेत. युवकांनी पुण्यापासून दुचाकी फेरी काढून भीमा कोरेगाव गाठले. प्रवासातील गावांमध्ये नागरिकांनी अभिवादनास येणाऱ्या अनुयायांना न्याहरी तसेच चहा देऊन पुढील मार्गक्रमण करण्यासाठी ताजेतवाने केले.

विजयस्तंभ परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून आतषबाजी तसेच सामुदायिक बुद्ध वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजयस्तंभास अभिवादन केले. समता सैनिक दल, महार रेजिमेंट सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

रविवारी रात्रीनंतर नगर रस्त्यावर वाहनबंदी करण्यात आली होती. अनुयायांसाठी २९ ठिकाणी आरोग्य बूथ उभारण्यात आले असून २० फिरते बाईक आरोग्य पथके, ५० रुग्णवाहिका, ९० तज्ज्ञ डॉक्टर्स आणि २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच जवळच्या खासगी रुग्णालयात पुरेशा औषध साठ्यासह शंभर खाटाही आरक्षित करण्यात आल्या आहेत.

अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा आणि पेरणे परिसरात येणाऱ्या लाखो अनुयायांना कोणत्याही सुविधा कमी पडणार नाहीत, याबाबतची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यावर्षी मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांबरोबरच बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासनाने वाढीव संख्येने जय्यत तयारी केली होती.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ‘बार्टी’चे विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी तयारीचा आढावा घेत सुविधांसाठी संबंधित यंत्रणांना सूचनाही दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments