Wednesday, January 22, 2025
Homeगुन्हेगारीडीआरडीओच्या कॅम्पसमधील कामाची कंत्राटे देताना कुरुलकरांनी केले महिलांचे लैंगिक शोषण

डीआरडीओच्या कॅम्पसमधील कामाची कंत्राटे देताना कुरुलकरांनी केले महिलांचे लैंगिक शोषण

पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप असलेले डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. ‘डीआरडीओ’मधील कामाची कंत्राटे देताना कुरुलकरांनी दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला जात आहे.

एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात याची माहिती देण्यात आली आहे. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचं समोर आल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने तपास सुरु केला. तेव्हा प्रदीप कुरुलकर मुंबईतील डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमधे सहा वेगवगेळ्या महिलांना भेटल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात समोर आलं. त्यानंतर या महिलांबाबत तपास सुरु करण्यात आला.

त्या तपासात डीआरडीओच्या कॅम्पसमधील वेगवेगळ्या कामांची कंत्राटे देण्यासाठी प्रदीप कुरुलकर यांनी दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती आहे. डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांच्यावर ‘झारा दास गुप्ता’शी बोलताना भारतीय क्षेपणास्त्र मोहिमेची माहिती दिल्याचा आरोप आहे. झारा दास गुप्ता या नावाने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा बनावट अकाऊंट चालवत असल्याचं समोर आलं आहे.

काय होता संवाद?
‘झारा दास गुप्ता : ब्राह्मोससाठी किती व्हर्जन मोडिफाइड केली गेली?

डॉ. प्रदीप कुरुलकर : मला वाटते खूप आहे. बरीचशी उपकरणे माझ्या आस्थापनेत असतील.

झारा दासगुप्ता : बेब, डिझाइन रिपोर्ट म्हणजे तुझ्या मते कसा असेल?

डॉ. प्रदीप कुरुलकर : बेब, याची तुला कॉपी व्हॉटसअॅप किंवा मेल करू शकत नाही. हे खूप संवेदनशील आहे. मी ती मिळवतो आणि तयार ठेवतो. तू इथे आल्यावर ती दाखवतो…’

हा संवाद आहे, संशोधन व विकास संस्थेच्या (आर अँड डीई) डॉ. प्रदीप कुरुलकर आणि पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता यांच्यामधील. कुरुलकर यांनी झाराला ऑनलाइन माहिती पाठविण्यासह अत्यंत गोपनीय माहिती दाखवण्याची तयारीदेखील दर्शवली होती, असे त्यांच्या व्हॉट्सअप चॅटिंगमधून स्पष्ट होत आहे.

‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या ‘ब्राह्मोस’, ‘अग्नी ६’, ‘मिसाइल लाँचर’, ‘एमबीडीए’ आदी क्षेपणास्त्रांसह ‘रुस्तम’, ‘सरफेस टू एअर मिसाइल’, ‘इंडियन निकुंज पराशर’ या प्रकल्पांची आणि ‘डीआरडीओ’च्या कामांची माहिती डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिला सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे पुरवल्याचे दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात निष्पन्न झाले आहे. ‘एटीएस’ने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक खळबळजनक बाबी समोर आल्या आहेत.

झाराने विचारले, ‘ब्राह्मोस हे तुझे इन्व्हेन्शन आहे का?’ असे विचारल्यावर कुरुलकर म्हणाले, ‘माझ्याकडे सर्व ब्राह्मोस आवृत्तीवर काही प्रारंभिक डिझाइन्स आहेत.’ त्यावर ती म्हणाली, ‘बेबी, हे एअर लाँच व्हर्जन ना? सुखोई ३०वर लागेल ना? आपण आधीपण यावर चर्चा केलीय.’ त्याला कुरुलकर यांनी ‘हो’ असे उत्तर दिले असून, पुढे त्यांनी ‘आमच्याकडे आता सर्व चार व्हर्जन आहेत,’ अशी माहिती दिली आहे.

डॉ. प्रदीप कुरुलकर यांना हेर झारा दासगुप्ता हिने ‘यूके’मधील सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याची ओळख सांगितली होती. त्यानंतर अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवून त्यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर दोघेही जून ते डिसेंबर २०२२पर्यंत एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र, त्यानंतर डॉ. कुरुलकर यांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले असावे; कारण फेब्रुवारी २०२३मध्ये डॉ. कुरुलकर यांनी झाराचा मोबाइल ब्लॉक केला होता. तिने अनोळखी क्रमांकावरून माझा मोबाइल ब्लॉक का केला, असा प्रश्न डॉ. कुरुलकर यांना विचारला, असे आरोपपत्रात नमूद आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments