क्रिती सेनॉन दिसणार आता नव्या भूमिकेत, अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत केली मोठी घोषणा
अभिनेत्री क्रिती सेनॉनने बॉलिवूडमध्ये नऊ वर्षे पूर्ण केली आहेत. इतक्या वर्षात मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान निर्माण करणाऱ्या क्रितीने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. अभिनेत्री असलेली क्रिती आता निर्माती झाली आहे. तिने स्वतःच्या चित्रपट निर्मिती कंपनीची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली.
क्रितीने व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “या जादूई इंडस्ट्रीत माझी स्वप्ने पूर्ण करून मला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मी लहान पाऊलं टाकली, शिकले आणि विकसित होत गेले आणि अभिनेत्री झाले! मला चित्रपट निर्मिती खूप आवडते. त्यामुळे त्यात जास्त काम करण्याची, नवीन गोष्टी शिकून घेण्याची, तुमच्या व माझ्या हृदयाला स्पर्श करणार्या आणखी कथा सांगण्याची माझी इच्छा आहे. आता मी मोठ्या स्वप्नांसह ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ सुरू करण्यास उत्सुक आहे!! लवकरच नवीन घोषणा करेन.”
दरम्यान, अभिनेत्री म्हणून नऊ वर्षांच्या करिअरनंतर क्रितीने आता स्वतःची चित्रपट निर्मात्या कंपनीची घोषणा केली आहे. तिने ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ असं कंपनीचं नाव ठेवलं आहे. क्रितीने याबद्दलची पोस्ट टाकताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रितेश देशमुख, वरुण धवन, हुमा कुरेशी, आनंद एल रॉय, संजना संघी, क्रिती खरबंदा यांनी कमेंट्स करत क्रितीला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास नुकताच क्रितीची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट रिलीज झाला होता. पण तो संवाद, व्हीएफएक्स व कलाकारांच्या लूकमुळे वादात अडकला. त्यामुळे चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला, ६०० कोटींच बजेट असलेला ‘आदिपुरुष’ ३०० कोटींची कमाईही करू शकला नाही. अशातच चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर क्रितीने तिने स्वतःची कंपनी सुरू केली आहे.