गुन्हेगारांना आता पोलिसांचा धाकच उरला नाही, असं चित्र पुण्यामध्ये दिसत आहे. पुण्यात सद्या काही टोळके कोयता घेऊन वाटेल तिथे दहशत माजवत आहेत. आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी भर दिवसा कोणावरही वार, तोडफोड, धमकवणे, खंडणी, असे प्रकार सर्रास करत आहेत. असाच काहीसा धक्कादायक प्रकार ५ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पुण्यातल्या भवानी पेठ परिसरात घडला. पाच अज्ञात तरुणांच्या टोळक्याने निशा नावाच्या रेस्टॉरंटची थोडफोड केली.
ही तोडफोड का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, रेस्टॉरंट मालक मोनिष शशिकांत म्हेत्रे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “तुमची हिंदूंची हॉटेल चालवण्याची औकात आहे का”, अशा शब्दांत धमकी देत रेस्टॉरंटमधील खुर्च्यांवर कोयत्याने वार करत खुर्च्यांची तोडफोड केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी खुर्च्या हवेत भिरकावल्या आणि रेस्टॉरंटचं मोठं नुकसान करून तिथून निघून गेले. या घटनेनंतर रेस्टॉरंट मालक व त्यांच्या कुटुंबात भीतीचं वातावरण पसरलं आहे. रेस्टॉरंट मालक तक्रार देण्यासाठी सुद्धा घाबरत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन ६ तारखेला तक्रार दाखल करुन घेतली आहे.