श्रावण महिन्यांत सणांची रैलचैल असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच पिठोरी अमावस्येला सर्जा-राजाचा सण म्हणजेच बैल पोळा 14 सप्टेंबरला गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी, बैलांचा थाट असतो. बैलांना या दिवशी कामापासून विश्रांती दिली जाते. पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्याचा सखा, मित्र सर्जा-राजासाठी पोळ्याचा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

अलिकडे कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले असले तर बैल पोळ्याचे महत्त्व कायम आहे. श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शेतकर्यांसोबत वर्षभर शेतात राब राब राबणार्या बैलांप्रती पोळ्याला कृतज्ञता व्यक्त केली जाते. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते.
काय आहे पौराणिक कथा?
पौराणिक कथेनुसार, प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रुपात धर्तीवर अवतरले होते. तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण महिन्यातील पिठोरी अमावास्येचा होता. या दिवशी बैल पोळा सण साजरा करण्यात येतो.

बैलांना दिलं जातं आमंत्रण
पोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी बांधव बैलांना आमंत्रण देतात. पोळ्याला बैलांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घातली जाते. नंतर चारुन घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला हळद व तूपाने शेकले जाते. त्यांचे पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झुल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य. बैलाची निगा राखणार्या बैलकरी, घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
आपला बैल उठुन दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सिमेजवळ एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस ‘झडत्या’ म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, गाव- शहरातील मानवाईकाकडून तोरण तोडले जाते. त्यानंतर पोळा फुटतो. बैलांची शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. बैलांना मारुतीच्या देवळात नेऊन घरी आणले जाते. ओवाळल्यानंतर बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.