चिंचवड मतदार संघातून भाऊसाहेब भोईर यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार – अनंत कोऱ्हाळे
चिंचवड येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख आणि मा. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून पुढे एक पाऊल टाकत त्यांनी काकडे पार्क, चिंचवडगाव येथील स्वतःचे जनसंपर्क कार्यालय देखील भोईर यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी दिले आहे. कोऱ्हाळे यांचे हे कार्यालय अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांचे चिंचवड येथील मध्यवर्ती कार्यालय असेल. सदरील कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी सायं. ५.०० होणार आहे. अशी माहिती अनंत कोऱ्हाळे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
भाऊसाहेब भोईर यांच्या उमेदवारीमुळे चिंचवड मतदार संघातील निवडणुकीमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. आजच्या घडामोडी नंतर तर निवडणुकीचे वारे बदलले आहेत. असेच चित्र दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदार संघ तसेच सुमारे पावणेसात लाख मतदार असलेल्या या भल्या मोठ्या मतदार संघात भाऊसाहेबांनी मोठी ताकद लावली आहे. तीन दशकांहून अधिक राजकीय अनुभव आणि प्रचंड जनसंपर्क याच्या जोरावर निवडणुकीत उतरलेल्या भाऊसाहेबांना आता मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.
“ऑल इंडिया फ्रेंड्स सर्कल”, सकल धनगर समाज, सकल मातंग समाज आणि आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे मा. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनी दिलेला पाठिंब्यामुळे भोईर यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. पुढील दिवसात मोठ्या घडामोडींची घडणार आहेत असे राजकारणातील जाणकार मंडळी यांच्याकडून वर्तवले जात आहे. या संदर्भात भाऊसाहेब यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की मी जिंकण्यासाठी मैदानात उतरलो आहे. यावेळी चिंचवडचाच आमदार होणार असून
आम्ही निवडणुकीच्या आखाड्याच्या प्रचारात मुसंडी मारलेली आहे.
कोऱ्हाळे म्हणाले की भाऊसाहेब भोईर हे माझे राजकीय जीवनातील गुरू आहेत. एवढेच नव्हे तर ते माझे मोठे बंधू आहेत. गेल्या एका तपापासून माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. वेळोवेळी त्यांनी मला मदत तसेच अनमोल मार्गदर्शन केले आहे आणि करत आहेत. ते पुढे म्हणाले की मी जरी शिवसेनेचा असलो तरी मी माझा व्यक्तिगत निर्णय घेवून चिंचवडचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मी चिंचवडचा असल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना तसेच चिंचवड वासियांना वाटते की आपल्या चिंचवडचा आमदार झाला पाहिजे. म्हणून मी आज पत्रकार परिषद घेवून भोईर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.