मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि चित्रपट क्षेत्र या अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नुकतंच केदार शिंदे यांनी ‘सही रे सही’ या नाटकाबद्दल भाष्य केले आहे.
सही रे सही या नाटकाने मराठी रंगभूमीवर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. या नाटकातील तीन मित्रांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. नाट्यप्रेमींच्या मनावर आपली छाप पाडणाऱ्या ‘सही रे सही’ या नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ मध्ये झाला होता. आज या नाटकाला रंगभूमीवर येऊन २१ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या नाटकाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या नाटकाच्या आठवणींना उजाळा दिला.
केदार शिंदे यांची पोस्ट
“सहजच वाटलं म्हणून लिहितोय. हे श्री. अशोक मुळे. त्यांना आमच्या नाट्य क्षेत्रातील अनेक लोकं पांढरे मुळे असही म्हणतात!! ३६५ दिवस रात्र ते फक्त पांढऱ्या कपड्यात असतात. त्यांच्या चारित्र्यावर आणि कपड्यावर डाग मी तरी पाहिला नाही. अनेक वेगवेगळे उपक्रम ते करत असतात. त्यासाठी कुणा कुणाला भेटून निस्वार्थ पणे उपक्रम तडीस लावतात. सही रे सही नाटकाला आज २१ वर्षे पुर्ण झाली. ते नाटक जेव्हा आलं तेव्हा मुळेकाका आमच्या पाठीशी होते. वर्तमानपत्रात जी नवनविन जाहिरात संकल्पना यायची ती यांच्याच डोक्यातून!!
बाईपण भारी देवा या सिनेमाच्या यशानंतर नुकतीच त्यांची भेट झाली. प्रेमाने तरी टोमणा मारून ते मला काहीतरी बोललेच. पण खर सांगू? ते एकमेव असतील ज्यांना उलट उत्तर देण्याची मला इच्छा होत नाही. कारण त्यांनी तो मान माझ्या मनात निर्माण केला आहे. कदाचित ते Instagram वर नसतीलच. ज्यांना जमेल त्यांनी ही पोस्ट त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. आपल्या आयुष्यात अशी माणसं असतात.. त्यांना जपायचे असतं. कारण त्यांच्या असण्याने आपलं आयुष्य समृद्ध होतं”, असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान केदार शिंदे यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यावर अभिनेत्री समीरा गुजरने एक कमेंट केली आहे. “अगदी खरं, कौतुक करावं तर त्यांनी, टीका करतील तीही पोटतिडकीने. पण इतकं निर्मळ मन त्यांच्या कपड्यांप्रमाणेच, की ती टीकाही गोड वाटावी, एकमेव”, असे तिने म्हटले आहे.