१८ सप्टेंबर २०२१,
नेहरू नगर येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक प्रकरणी महामानव एक्सप्रेस असंघटीत कामगार संघटना अध्यक्ष गिरीश साबळे व संघटनेतील सभासद कर्मचार्यांनी आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेतली. यावेळी आपल्या समस्यां आमदारांसमोर मांडल्या. व न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
महामानव एक्सप्रेस असंघटीत कामगार संघटनेचे सभासद हाऊस किपींग, वार्ड बॉय, वॉर्ड मावशी, रुग्न काळजी घेणे, अशा विविध पदावर रुजू होते. मात्र कोणतीही पूर्वकल्पना ना देता त्यांना १५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता कामावरून कमी केल्याचा मेसेज आला, कोणतीही कायदेशीर नोटीस ना देता कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. कोविडच्या अत्यंत कठीण काळात स्वतःची व आपल्या कुटुंबाची पर्वा ना करता या कर्मचाऱ्यांनी रूग्णांची मनोभावे सेवा केली.
तसेच कामावर रुजू होतांना जे वेतन ठरले होते ते ना देता प्रत्यक्षात कामगारांना कमी वेतन देण्यात आले, पी. एफच्या नावाखाली वेतनात कपात करण्यात आली, असे कामगारांचे म्हणणे होते. ठेकेदाराने आमची फसवणूक केली असून, या बाबतीत सखोल चौकशी करण्यात यावी, व कामगारांना न्याय मिळावा, अशी मागणी आमदार बनसोडे यांना यावेळी करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष व कामगारांचे व्यथा ऐकून घेतल्यावर आमदार बनसोडे यांनी त्यांना लवकरात लवकर पालिका प्रशासनासोबत बोलून विषय निकाली काढू, तसेच ज्या कामगारांना तात्काळ कामावरून काढले आहे, त्यांना इतर ठिकाणी तातडीने भरती करून घेण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार बनसोडे यांनी दिले