२० जानेवारी २०२०,
भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची निवड झाली आहे. प्रथेप्रमाणे सर्वसहमतीनं त्यांची निवड झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंह यांनी तशी घोषणा केली. अध्यक्षपदासाठी खुद्द अमित शहा यांनी नड्डा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्यास सहमती असल्यानं नड्डा यांची निवड ही केवळ औपचारिकता उरली होती. ती पूर्ण झाली. संघटन कुशल असलेले नड्डा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व मोदींच्याही जवळचे मानले जातात. त्यांच्या निवडीत हा घटकही महत्त्वाचा ठरल्याचं बोललं जात आहे.
मोदींच्या नव्या सरकारमध्ये त्यांची गृहमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर नड्डा यांची कार्यकारी अध्यक्षपदी वर्णी लागली होती. तेव्हाच त्यांच्याकडं भविष्यात मोठी जबाबदारी येणार, असं मानलं जात होतं. तो अंदाज खरा ठरला आहे. लो प्रोफाइल व स्वच्छ प्रतिमेच्या नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष दमदार वाटचाल करेल, असा विश्वास ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.