जेष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान; साहित्य, पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांची राहणार उपस्थिती
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात थरार न्यूज नेटवर्कचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते रोहित खर्गे यांना प्रतिष्ठेचा ‘भला माणूस’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येणार असून, ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे सचिव तथा ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता चिंचवड येथील ऑटो क्लस्टरसमोरील सायन्स पार्क येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात साहित्य, पत्रकारिता, समाजसेवा, उद्योग, कला आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.
रोहित खर्गे यांनी थरार न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सातत्याने प्रभावीपणे मांडले आहेत. पत्रकारितेसोबतच विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि गरजूंना मदत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीने त्यांची ‘भला माणूस’ पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या सोहळ्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उद्योजक राजेश सांकला, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष तथा उद्योजक सुदाम भोरे, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब तसेच राष्ट्रपती पोलीस पदक विजेते ज्येष्ठ कवी सीताराम नरके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
साहित्य, पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याकडे शहरातील साहित्यप्रेमी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे.


