राज्यात एकीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांसंदर्भात अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी चालू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याची टीका शरद पवार गटाकडून केली जात आहे. यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसकडूनयाचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. याची सुनावणी आता १३ ऑक्टोबर रोजी अर्थात शुक्रवारी होणार आहे.
दोन्ही गटांच्या याचिकांवर एकत्र सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर आज होणारी सुनावणी येत्या शुक्रवारी अर्थात १३ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. त्याच दिवशी ठाकरे गटाच्या याचिकेवरही सुनावणी होणार असून या दोन्ही गटांच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेतली जाणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं यावेळी नमूद केलं. यासंदर्भात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली.
“सर्वोच्च न्यायालयाकडून आमच्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहेत. आम्हाला काहीसा न्याय मिळाल्याचं दिसतंय. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या याचिका १३ तारखेला सुनावणीला घेतल्या जातील. न्याय मिळेल असं मला वाटतंय. आम्ही २ जुलैलाच अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. त्या कधी दाखल केल्या हे महत्त्वाचं नसून निर्णय कधी होईल हे महत्वाचं आहे”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.