१६ डिसेंबर
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया विद्यापीठ आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात करण्यात आलेल्या पोलीस कारवाईविरोधात काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांनी निषेध व्यक्त केला असून इंडिया गेटवर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. प्रियंका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, ए के अँटनी यांच्यासहित अनेक ज्येष्य नेतेही आंदोलनाला बसले आहेत. प्रियंका गांधी जवळपास दोन तास ठिय्या आंदोलन करणार आहेत. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला असून देशभरातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी यावरुन टीका करताना केंद्र सरकारवर टीका केली असून हे भ्याड सरकार आहे अशा शब्दांत निषेध व्यक्त केला होता.
दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. जेव्हा देशातील युवा शक्ती, विद्यार्थी शक्ती जागृत होते, तेव्हा देशात परिवर्तन घडतं. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार केला असून भाजपच्या अहंकारामुळे सुरू झालेलं हे दमनचक्र म्हणजे मोदी सरकारच्या अंताची सुरुवात आहे, अशी घणाघाती टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेला हिंसाचार दुर्दैवी – नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी आणि खूप त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे लोकशाहीचे भाग आहेत. पण सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं तसंच दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणं आपल्या नैतिकतेला धरुन नाही”
Violent protests on the Citizenship Amendment Act are unfortunate and deeply distressing.
Debate, discussion and dissent are essential parts of democracy but, never has damage to public property and disturbance of normal life been a part of our ethos.
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2019