देशासह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये उच्चभ्रू सोसायट्यात चोऱ्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. गुगलवर उच्चभ्रू सोसायट्यांमधले बंगले सर्च करून तिथे जग्वार सारख्या महागड्या गाड्यांमध्ये जाऊन आरोपी चोरी करत होते. आरोपींनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि गोव्याच्या राज्यपालाच्या घरी देखील चोरी केली आहे. अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपी रॉबिन हूड उर्फ मोह्ममद इरफान (वय 33 रा. बिहार) याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून तब्बल एक कोटी एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीविरोधात उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पंजाब आणि गोव्यात एकूण 69 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलिसांनी रॉबिन हूडचे साथीदार शमीम शेख (वय 34 रा. बिहार), अभ्रार शेख (वय 50 रा. धारावी, मुंबई) आणि राजू म्हेत्रे (वय 50 रा. धारावी, मुंबई) यांना देखील अटक केली आहे.
चोरट्यांनी अजित पवारांचे नातेवाईक जगदीश कदम यांच्या घरी चोरी केली होती. दहा फेब्रुवारी रोजी चोरांनी पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या सिंध सोसायटीमध्ये चोरी केली. चोरट्यांनी जगदीश कदम यांच्या घरातून परदेशी बनावटीचे पिस्टल, 12 जिवंत काडतुसे, तीन महागडे घड्याळे, चार तोळे सोनं आणि दोन लाख रुपये रोख असा मुद्देमाल लांबवला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
रॉबिनहूड उर्फ मोह्ममद इरफान याची बायको बिहारमधील सीतामढीची जिल्हा परिषद सदस्य आहे. त्याने आपल्या गावात आतापर्यंत चोरीच्या पैशांमधून लाईट, रस्ते आणि इतर कोट्यवधीची विकास कामे केली आहेत. त्याला त्याच्या गावात उजाला या टोपण नावाने देखील ओळखले जाते.